माझा मित्र भूषण आणि मी मिळून १७ ते १९ जून १९९३ या दिवसात केलेल्या गिरिभ्रमंतीचा हा वृतांत आहे. आज जवळजवळ बारा वर्षांनी माझ्या डायरीत हा लेख बघताना मला तुम्हालाही हा लेख वाचून मौज वाटेल असे वाटल्याकारणाने मी इथे देत आहे.
अगदी अनपेक्षितपणे भूषणचा १५ जूनला फोन आला. त्याच्या आणि माझ्या सर्व परीक्षा संपलेल्या असल्याने आम्ही दोघेही कोठेतरी गिरीभ्रमंतीला जायला अगदी आतुर झालो होतो. पण इतर मित्रांच्या परीक्षा संपलेल्या नव्हत्या. मग आम्ही दोघांनीच कुठेतरी जायचे ठरवले. पण कुठे जायचं ते मात्र अजून निश्चित केलेलं नव्हतं. दोघांच्याही मनात भिमाशंकरला जायचं होतं. पण नक्की काय ते नंतरच ठरवू असं ठरलं. १६ तारखेला आजी-आजोबांना सोडायला मी रोह्याला गेलो होतो त्यामुळे hikeची यथासांग तयारी करता आली नाही. साधारण रात्री साडेनऊला सामानाची जमवाजमव करायला सुरुवात केली. त्या घाईत स्टोव्ह मिळवता आली नाही. पावसाचे दिवस असल्यामुळे स्टोव्ह आवश्यक होता. मनिषकडे स्टोव्ह मिळण्याची शक्यता होती. पण एवढ्या रात्री त्याच्याकडे जायचा कंटाळा आला. नंतर त्याचा मला बराच पश्चात्ताप झाला. त्यातच आई खूप कामात असल्यामुळे नेहेमीचं पुर्या किंवा पराठे वगैरे द्यायला तिला जमलं नाही. मग जमेल ते सामान जमा केलं. ३-४ दिवसाचे कपडे. बिस्किटे पाव वगैरे नेहेमीचे पदार्थे आणि शिवाय खिचडी वगैरे करायचा शिधा. पावणेपाचाचा गजर लावून झोपी गेलो. १७ जूनला चार वाजताच जाग आली. कुठे जायचं असलं की मला झोपच लागत नाही. सगळं आटोपून साडेपाचाची कर्जत लोकल पकडली. पावणेसात पर्यंत कर्जत एस्टी स्टॅंडवर पोचलो. पण काय! भूषणचा पत्ताच नव्हता. भूषणची वाट पाहता पाहता माझ्या मनात विचार घोळू लागले. नेहेमीसारखी एक छोटी हाइक करण्यापेक्षा जर पेठ-भिमाशंकर किंवा ढाक-भिमाशंकर असा एखादा ट्रेक केला तर? पण अशाप्रकारचा ट्रेक करता येतो (अश्या पायवाटा अस्तित्वात आहेत) या व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती नव्हती. अश्या प्रकारचे ट्रेक केल्याची वर्णनं इतरांकडून बरीच ऐकली होती पण तपशील माहित नव्हता. मग हे जमणार कसं? असा विचार मनात घोळत असतानाच भूषण आला. त्याला पहिली कर्जत गाडी पकडायला जमलं नव्हतं पण दुसर्या गाडीने तो आला. आल्या आल्या खांडसकडे जाणार्या गाडीची चौकशी झाली (खांडस हे भिमाशंकरच्या पायथ्याशी आहे.). ती गाडी सव्वानऊला होती. माझ्या मनातला विचार मी भूषणला सांगितला. तोही असाच काहीतरी विचार करत होता. मग ठरलं की आधी ढाकला जायचं. आणि तिथे चौकशी करून काय ते ठरवायचं. आठ वाजताची वदपला जाणारी गाडी पकडली (वदप हे ढाक किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.). पावणेनऊला वदपला पोचलो. बाटल्या पाण्याने भरून घेतल्या आणि वर चढायला सुरुवात केली. समोरचे डोंगर धुक्यात होते. वरचं काही दिसत नव्हतं. पावसाचा मात्र पत्ता नव्हता. डोंगरावरून धुकं ओसंडून वाहत होतं. सूर्य ढगाआड होता. पहिला चढ चढेपर्यंतच दोघे वैतागलो. जरा बिस्किटं खाल्ली. पाणी प्यायलो. पण वर चढायचा मूड लागेना. सूर्य ढगाआड होता तरी खूपच उकाडा होता. पावसातली हाइक आणि आम्ही पाठीवर ऊन घेऊन चढत होतो. रमत गमत एकदाचा तो चढ कसातरी पार केला. साधारण बारा वाजता गारुबाईच्या मंदिराजवळ पोचलो. हे ढाकच्या अर्ध्या वाटेवर आहे. पण मंदिराच्या आसपास पाण्याची सोय नाही. म्हणून मग सरळ जवळच्या गावातच गेलो. मागच्या ढाक भेटीत ज्या रतन ढाकवालेची मदत घेतली होती त्याच्याच घरात जेवण केलं. ब्रेड-जॅम वगैरे खाल्लं. तोपर्यंत पाऊस चांगलाच सुरू झाला होता. अतिशय जोराचा पाऊस आणि अतिशय दाट धुकं. जेमतेम ५० मिटरच्या पलिकडलं काहीही दिसत नव्हतं. रतनची आई तर आता आम्ही पुढे जाऊच शकणार नाही असं म्हणू लागली. आमच्याही मनात धाकधूक होती. कारणही तसंच होतं. गारुबाईचं पठार प्रचंड पसरलेलं. त्यात धुक्यामुळे आणि पावसामुळे सगळ्या दिशांना एकच दृश्य दिसत होतं. त्यामुळे दिशाज्ञान अशक्यच. त्यातच माळावर गुरं चरायला नेणार्या गुराख्यांनी इतक्या असंख्य वाटा करून ठेवल्या होत्या की एकदा वाट चुकल्यावर परत मार्गावर लागणं कठीण. मग अश्या परिस्थितीत हरवायला कितीसा वेळ लागतो? पण जिद्दीने आम्ही निघालो. पण मनात कायम हरवण्याची भिती होती. पावसाळ्यात हरवण्याचा एक तोटा असा की चालता चालता दिवस संपला तर जिथे आहोत तेथेच सकाळपर्यंत विश्रांती घेणं अशक्यच. त्यातच गारुबाईच्या पठारावर आसरा घेण्याइतकी मोठी झाडंही नाहीत. त्यामुळे रात्र पडायच्या आत निवार्याच्या जागी पोचणं अत्यंत महत्वाचं होतं. त्या दृष्टीने आमच्याकडे सहा तास होते. कारण साधारण सव्वा वाजता आम्ही ढाक गावातून बाहेर पडलो होतो. सूर्य मावळला तरी पायवाटेने सुरक्षित चालण्याइतके सात साडेसात पर्यंत दिसते. बहिरी सुळका ढाक किल्ल्याच्या वाटेवर साधारण तासभर अलीकडे आहे. आम्हाला भिमाशंकरच्या दिशेने जायचे असल्याकारणाने आम्ही बहिरी सुळक्याच्या पायथ्याशी पोचताच तिकडून डावीकडे वळून कोंडेश्वरकडे जाणार होतो. ढाक गावापासून बहिरी सुळका साधारण चार पाच किमी वर आणि कोंडेश्वर तिथून पुढे साधारण सात-आठ किमी वर आहे. बहिरी सुळक्यापासून कोंडेश्वरची वाट सोपी आणि गावकर्यांच्या वहिवाटीची आहे असे रतनकडून कळले होते. बहिरी सुळक्यापासून कोंडेश्वरला पोचेपर्यंत साधारण दोन तास लागतील असे गृहीत धरून ढाकच्या त्या पठारावर हरवण्यासाठी आमच्याकडे चार तास होते. मग आमचा सर्व 'कॉमन सेन्स' आणि एकंदर दिशाज्ञान पणाला लावून अडीचतीन तासात बहिरी सुळक्यापर्यंत पोचायचं होतं. आणि समजा आम्हाला रस्ता सापडला नाही तर परत मागे ढाक गावात तरी सुखरूप पोचता यावं म्हणून आम्ही पायवाटेवर खुणा करायचं ठरवलं. पण खुणा करणार कश्या? आणि केलेल्या खुणा पावसात टिकणार कश्या? जिथे तिथे रस्त्याला फाटे फुटत होते. आम्ही ज्या रस्त्याने आलो तो आम्हाला परत येताना मिळावा म्हणून मग आम्ही वाटेवरचे दगड गोळा करून त्याचा एक बाण परत जायच्या दिशेने करायचं ठरवलं. अशाप्रकारे जाण्यात फार वेळ जात होता पण त्याला इलाज नव्हता. आमची योजना बरोबर चालते आहे की नाही हे पाहण्यासाठी परत एकदा मागे जाऊन आमचे 'बाण' सापडतायत का ते पडताळून पाहिलं. असं करत करत आम्ही साधारण सव्वादोन तासात बहिरी सुळक्याच्या पायथ्याशी पोचलो. साडेतीन वाजले होते. शेवटच्या टप्प्यात म्हणजे जेंव्हा ढाकच्या डोंगराखालचं जंगल दृष्टिपथात येतं तेंव्हा धुकं पार नाहीसं झालं होतं. ढाक किल्ल्याची तटबंदीसुद्धा दिसत होती. त्यामुळे आम्ही बरोबर पोचलो आहोत याची आम्हाला खात्री पटली. पुढचा रस्ता जंगलातला असल्यामुळे चुकण्याची संधी नव्हती. पण कोंडेश्वरला जाणारा रस्ता ढाकवरुन पुढे जातो की भिमाशंकरला जाणार्या रस्त्यावरून ते आम्हाला आठवत नव्हतं. त्यामुळे ढाकच्या रस्त्यावरून बहिरी गुहांना जाणार्या रस्त्यापर्यंत जाऊन आलो. तिथून पुढे दुसरा कुठलाच रस्ता नव्हता. म्हणजे कोंडेश्वरला जायला भि.शं.च्या रस्त्यावरूनच जायचं होतं तर. ह्या सर्व खटाटोपात तासभर वाया गेला. ढाक गाव सोडल्यापासून पाऊस एक क्षणभरसुद्धा थांबला नव्हता. आम्ही कोंडेश्वरच्या वाटेला लागलो. वाटेत पुण्याच्या 'झेप' ह्या संस्थेने दगडावर काढलेला नकाशा लागतो. ढाकपासून एकाबाजूला राजमचीकडे आणि दुसर्याबाजूला भिमाशंकरकडे जाता येते. इथे पोचेपर्यंत नक्की कुठे जायचं ते अजून नक्की केलं नव्हतं. राजमाचीचा रस्ता सोपा आणि जवळचा आहे. खूप लोक असा ट्रेक करतात त्यामुळे वाटही चांगली रुळलेली आहे. भिमाशंकरचा पल्ला थोडा लांबचा. मी राजमाची म्हणत होतो. पण भूषणचा मात्र भिमाशंकरचाच आग्रह चालला होता. शेवटी भिमाशंकरच असं ठरलं आणि कोंडेश्वरच्या दिशेने आम्ही निघालो. कोंडेश्वरच्या वाटेवर चुकण्याचा प्रश्नच नव्हता कारण ही वाट दाट जंगलातून आणि डोंगराच्या सोंडेवरुन जाते. साडेसहालाच कोंडेश्वरला पोचलो. तिथे मुक्काम करायचा आमचा बेत होता. पण पुण्याचे काही लोक आधीच तेथे येऊन थांबले होते. त्यामुळे तिथे अजिबात जागा नव्हती. त्या मंदिराच्या वरच्या बाजूला दुसरे एक छोटे देऊळ होते पण ते राहण्यालायक नव्हते. मग शेवटी जांभिवली गावात जायचे ठरवलं. जांभिवली गाव कोंडेश्वरापासून जवळच आहे. पहिल्याच घरात चौकशी केली. तेथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था झाली. मग पावसात भिजलेले ओले कपडे दोरीवर वाळत घालून, कोरडे कपडे चढवून आम्ही स्वयंपाकघरात आलो. जेवण म्हणजे फक्त भात! पहिला भात. दुसरा भात.. भात आणि अजून भात. भाताबरोबर काय तर बेसन! म्हणजे मिरच्यांचा ठेचा घातलेलं पिठलं. दोन्हीही नावडतं. पण मिळेल ते गोड मानून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. घरातल्या त्या म्हातार्या बाईने बरेच सौजन्य दाखवले. जेवण झाल्यावर भिमाशंकरची चौकशी केली. तर ती बाई म्हणते 'एस्टीने जा की कशाला उगाच पायपीट करताय?'. आता तिला काय सांगणार? उद्या गावात विचारू कोणालातरी असं ठरवलं. दोघांचीही पाठ दुखत होती. मग एकमेकांना पाठीला आयोडेक्स चोळलं. गप्पा मारत मारत रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास झोपी गेलो. भिमाशंकरला पोचायला अजून दोन दिवस लागणार होते. आजचा दिवस तर चांगला गेला आता पुढे काय होतंय बघायचं...
पहाटे पहाटे अचानक गलबला ऐकू आला. घरातली सगळी मुलं-माणसं लगबगीनी काठ्या घेऊन कुठेतरी निघाली होती. ‘काय झालं?’ मी विचारलं. ‘काही नाही आम्ही माळावर खेकडे पकडायला चाललोय.’ ‘ओह!’ असं म्हणून मी परत झोपी गेलो. सकाळी साडेसहाला जाग आली. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. प्रातःविधी आटोपले. म्हातारीने तयार केलेला थोडा भात खाल्ला. एक मोठी भाकरी बरोबर घेतली. आता आमच्याजवळ खाण्याचे सामान म्हणजे भूषणकडच्या पुर्या, थोडा ब्रेड, चटणी, जॅम वगैरे एका जेवणास पुरेल इतकं होतं. खिचडी करायला शिधा होता पण स्टोव्ह नसल्यामुळे जर आज रात्री चुलीची काही व्यवस्था झाली नाही तर जेवायचं काय करायचं हा प्रश्नच होता. पण तो रात्रीचा प्रश्न होता. तो रात्री सोडवूया असा विचार केला. सध्या आम्हाला ‘आता भिमाशंकरला जायची वाट कशी शोधायची?’ हा प्रश्न होता. काल रात्री दोरीवर काढून ठेवलेले आमचे ओले कपडे अजिबात वाळलेले नव्हते. पण फार वजन होऊ नये म्हणून आम्ही मोजकेच कपडे बरोबर घेतले होते. त्यामुळे परत तेच ओले कपडे अंगावर चढवले. सकाळच्या गारठ्यात ते ओले कपडे अंगावर चढवताना ‘कुठून ह्या ट्रेकच्या भानगडीत पडलो? त्यापेक्षा सरळ एस्टी पकडून घरचा रस्ता धरावा’ असा विचार मनात आला. म्हातारीला तिच्या आदरातिथ्याबद्दल आमच्यापरीने होईल ती आर्थिक भरपाई (विद्यार्थीदशेत असे कितीसे पैसे असणार आमच्याकडे?) करून साधारण साडेसातला आम्ही निघालो.
जांभिवली गावात भिमाशंकरच्या रस्त्याची चौकशी केली. एस्टी थांब्यावर एकाने एका शेताकडे बोट दाखवून ‘त्या शेताच्या पल्याड जा, तिकडून परत पायवाट सुरू होते तिथे पुण्याकडच्या पोरांनी खुणा केल्यात’ अशी माहिती दिली. शेत पार करून आम्ही भिमाशंकरच्या वाटेला लागलो. आजचा दिवस वेगळा होता. आज आम्हाला आमच्या अंतिम लक्ष्याची केवळ पुसटशी कल्पना होती. तिथे पोचायला किती वेळ लागेल, रस्ता कसा आहे वगैरेची काहीच कल्पना नव्हती. पण एक गोष्ट खरी की वाटेत बरीच गावे होती त्यामुळे कुठे रस्ता चुकलो तरी कुठेतरी माळरानात नाहीतर जंगलात अडकून पडू अशी भिती नव्हती. शिवाय अजून एक जमेची बाब म्हणजे पुण्याच्या ‘झेप’ संस्थेने भिमाशंकरच्या वाटेवर बाणाच्या खुणा केल्या होत्या. त्यामुळे दिशा-दर्शन होत होते. पण बाणाच्या खुणा नेमक्या कुठपर्यंत आम्हाला साथ देतील ह्याची मुळीच कल्पना नव्हती. बाणांच्या खुणा शोधत शोधत मार्गक्रमणा चालू होती. वाट अगदी घनदाट जंगलातून जात होती. पाऊस थोडी विश्रांती घेत होता. सगळीकडे धुकंच धुकं होतं. आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. केवळ बाणांच्या आधारावर आम्ही जात होतो.
पण मधेच घोटाळा झाला. साधारण साडेनऊच्या सुमारास एका ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटत होते तिथे बाणाने दाखविलेल्या डाव्या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. पुढे एक ओहोळ लागला. आणि त्यानंतर वाट एकदम लुप्त झाली. याचा अर्थ काय? काहीच मार्ग निघेना तेव्हा परत एकदा ‘त्या’ बाणाच्या ठिकाणी जायचं ठरवलं. आतापर्यंत बाणावरून वाट शोधताना बर्याच गोष्टी आमच्या लक्षात आल्या होत्या. बाण रंगविणार्या मंडळींनी चांगले डोके लढविले होते. बाण तैलरंगनी रंगविलेले होते, त्यामुळे पावसाळ्यातही टिकून राहात. पांढर्याशुभ्र तैलरंगात रंगविल्यामुळे हे बाण कमी प्रकाशातही लांबून सहज दिसत. बाण साधारण २००-३०० मिटर अंतरावर असत. वळण असेल तर मात्र अगदी जवळ जवळसुद्धा बाण असत. रस्त्याला फाटे फुटत असतील तिकडे योग्य मार्ग सापडावा म्हणून अनेक बाण असत. सर्व बाण नेहेमीच शक्यतो मोठ्या दगडावर केलेले असत. जेथे मोठे दगड नसतील तेथे मात्र मिळेल त्या दगडावर बाण केलेले असत. छोटे दगड पाण्यामुळे किंवा इतर कारणांनी आपली जागा बदलून भलतीच दिशा दाखवण्याची शक्यता असते. ‘तो’ बाण परत निरखून पाहिल्यावर आम्हाला लक्षात आलं की घोटाळा झाला होता तो ह्याच कारणाने. खूण केलेला दगड अगदी बारकासा होता. तिथे कुठे जोरात पाण्याचा प्रवाह वगैरे नव्हता म्हणजे बहुतेक मुद्दामच कोणीतरी खोडसाळपणे तो दगड हलविला असावा. दुसर्या वाटेवरुन जरा पुढे गेल्यावर अनेक बाण सापडले. मग परत मागे येऊन ‘तो’ चुकीचा दगड सरळ केला. तो दगड सहजा-सहजी हलवता येऊ नये म्हणून त्याच्याभोवती बरेच दगड रचले आणि त्या खोडसाळ लोकांच्या नावाने मनातल्या मनात बोटे मोडून पुढचा रस्ता धरला.
बाण शोधत शोधत आम्ही कुसुर गावाच्या वर असलेल्या वाडीत पोचलो. गाव जवळ आले की बाण एकदम लुप्त होत. गावातल्या लोकांना बाणांविषयी माहिती नसे. एक विशेष बाब म्हणजे सर्व गावकरी लोक “तुम्हाला वाट सापडणारच नाही. कशाला उगाच पायी जायच्या भानगडीत पडताय? जा की सरळ एस्टीनी” अशीच सुरूवात करत. माझ्याकडे ‘ट्रेक द सह्याद्री’ ह्या पुस्तकातले नकाशे होते. पण त्यात वाटा कुठे कश्या आहेत ही माहिती नव्हती. केवळ किल्ले, गावे आणि मोठे (वाहनांचे) रस्ते इतकाच तपशील होता. गावकर्यांकडून मिळणारी माहिती बर्याचदा विसंगत असे. त्यांच्याकडून मिळणार्या माहितीवरुन आणि नकाशावरुन काहीतरी संगती लावून आम्हालाच काय तो निर्णय घ्यावा लागे. कुसुर गावतल्या लोकांना बाणांविषयी काही माहिती नव्हती. कोणी म्हणत की ‘चार तासात इकडून भिमाशंकरला पोचाल!’ म्हणजे चालत की गाडीनी? माझा मनातल्या मनात प्रश्न. कोणी म्हणत होते की सावले गावात पोचायलाच दोन तास लागतील.
तिथे एक छोटी शाळा होती. चालून बरेच दमलो होतो. तिथे जरा टेकायचे ठरवले. आज शुक्रवारचा दिवस पण शाळेत कोणीच विद्यार्थी दिसत नव्हते. तिथल्या ‘मास्तर’शी जरा गप्पा मारल्या. मास्तर म्हणजे विशीतलाच एक तरूण होता. त्या गावातला तोच सर्वात जास्त शिकलेला म्हणजे बिएड झालेला आहे असे त्याने अभिमानाने सांगितले. त्यानेही मग आमची कोण? कुठले? वगैरे चोकशी केली. भूषण कायम बोलण्यात पुढे! त्यामुळे त्याने लगेच मी मुंबईला आयआयटी मध्ये केमिकल इंजिनीयरींग शिकतो अशी ‘आगाऊ’ माहिती दिली. त्या मास्तरला आयआयटी म्हणजे काय ते माहित नव्हते आणि केमिकल इंजिनीयर म्हणजे काय त्याचाही पत्ता नव्हता. ‘शिवील’ सोडून आणखी कुठल्याही प्रकारचे ‘इंजिनेर’ असतात ह्याची कल्पनाच नव्हती त्याला. त्याने लगेच विचारले ‘केमिकल इंजिनीयरींग म्हणजे काय?’. आता काय सांगणार? ‘अहो म्हणजे खतांच्या कारखान्यात काम करणारे इंजिनीयर’ – भूषण. शेतिसंबंधाने काहीतरी सांगितल्यावर मग मास्तरला जरा कल्पना आली. पण मी मात्र अजिबात तोंड उघडले नाही. नाहीतर ‘कॉम्प्यूटर’ म्हणजे काय? हे सांगता सांगताच आमची पुरेवाट झाली असती. गावात वीज होती पण टिव्हीच्या पलिकडे कोणतीही अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणी पाहिली नसणार तिथे कॉंम्प्यूटरची गोष्टच सोडा.
मास्तरला मग भिमाशंकरच्या वाटेविषयी विचारले. त्याने खांडी गावात जायला सांगितले. नकाशावरुनही खांडी गावाकडेच जायला हवे असे वाटत होते. अखेर आम्ही खांडी गावाकडे निघालो. आमची मुख्य अडचण ही होती की कोणत्याही अनुभवी गिर्यारोहकाचे काही मार्गदर्शन न घेताच आम्ही चाललो होतो. साधारण पाऊणला आम्ही खांडी गावात पोचलो. तिथेही परत गावकरी उलटे-सुलटे काहीतरी सांगत होते. नकाशा आणि गावकर्यांनी सांगितलेली माहिती ह्यांचा ताळमेळ लावून शेवटी पुढचा मार्ग सावले गावातूनच जात असणार असा अंदाज आम्ही बांधला आणि सावले गावाकडे निघालो.
खांडी-सावले अंतर साधारण ४-५ किमी होते. झपझप पावले टाकत आम्ही सावले गावाकडे निघालो. वाटेत परत एकदा रस्ता चुकलो. तिथे एका शेतकर्याला सावले गावाची वाट विचारली. शेवटी पावणेदोनच्या सुमारास सावले गावात पोचलो. प्रचंड भूक लागली होती. पावसाने चिंब भिजून जड झालेल्या आमच्या पाठिवरच्या पिशव्या खाली टाकल्या. आतलं सगळं सामान प्लास्टीकच्या पिशव्यांत असल्याने कोरडं होतं. मनसोक्त जेवण केलं. आता बिस्किटे वगैरे चिल्लर खाण्याचे पदार्थ वगळता आमच्याकडे तयार जेवणाचे काहीही शिल्लक नव्हते. आभाळ अगदी दाटून आलं होतं. कोणत्याही क्षणी धूमधडाक्याचा पाऊस सुरू होईल अशी चिन्हे होती. आता पुढे काय करायचे ते लवकर ठरवायला हवे होते. जर आज रात्रीच्या आत वांदरे गावात पोचलो तर उद्या सकाळी जेवायला भिमाशंकरला पोचू असं एकंदर नकाशावरून दिसत होतं. आज रात्रीला कुठेतरी गावात आसरा घेणं अत्यंत जरूरीचं होतं. कारण आमच्या कडचं सगळं तयार अन्न संपलं होतं म्हणजे रात्रीला आज चुलीची व्यवस्था करून खिचडी करायची किंवा कालच्यासारखंच कोणाकडे तरी रहायचं हेच दोन पर्याय होते. सावले-वांदरे वाटेवर वांदरे खिंड लागते. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे जर जाई-जाईपर्यंत रात्र झाली तर आमचे वाईट हाल होतील ही भिती होती. गावकर्यांना विचारलं. ‘रातच्या आत काय तुम्ही पोचत नाय’ असं सगळ्यांनी एकमताने सांगितलं. पावणेतीन वाजले होते. ‘उरलेला दिवस कशाला वाया घालवायचा? जर सहा पर्यंत आपण पोचत नाही असं वाटलं तर सावले गावात परत येऊन रात्रीचा मुक्काम करू!’ असा माझा प्रस्ताव. ‘जरा विश्रांती घ्याऊया’ असा भूषणचा प्रस्ताव होता. काय करावे हे ठरवण्यात बरीच चर्चा झाली.
खरंतर आम्ही दोघे खूप दमलो होतो. पण उरलेला सगळा दिवस नुसता बसून काढणे काही मला पटेना. नकाश्यावरून मध्ये येणारी वांदरे खिंड लक्षात घेता वांदरे गावात तीन साडेतीन तासात पोचू असा आमचा अंदाज होता. भूषण कंटाळला होता आणि न जाण्याची भाषा करत होता. पण मी जोर करून त्याला तयार केलं. ह्या गावातल्या लोकांनाही ‘झेप’च्या बाणांविषयी काही माहिती नव्हती. पण त्यानी दाखविलेल्या रस्त्याने आम्ही निघालो.
साडेतीन वाजले होते. तो रस्ता म्हणजे चिखलाने भरलेली नदीच होती. पाय फूटभर चिखलात रुतत होते. बर्याच दूरवर ही वाट जंगलात जात आहे असे दिसत होते. पण आत्ता आम्ही उघड्या माळरानावर होतो. बाणांचा काही पत्ता नव्हता. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. तुफान जोराचा पाऊस. असा जोरदार पाऊस मी आजवर कधी पाहिला नव्हता. खूप जोराच्या पावसाला आभाळ फाटलंय अशी उपमा का देतात त्याचा प्रत्यय आला. पाच-दहा फुटापलीकडचं काहीही दिसत नव्हतं. पावसाचे टपोरे थेंब अगदी गारांसारखे लागत होते. वाराही तुफान होता. पाऊस आडवातिडवा येत होता. पावसाचा मारा अगदी सहन होत नव्हता. आमचा चालण्याचा वेग अजूनच मंदावला. आडव्यातिडव्या पावसाचा चेहेर्यावर होणारा मारा अगदी सहन होईनासा झाल्यावर आम्ही नाईलाजाने आमच्या पाठीवरच्या पिशवीतून छत्र्या काढल्या. पावसाळ्यात गिरीभ्रमणाला येऊन छत्री वापरण्याची ही पहिलीच वेळ!
पाठीवर वजन, पायाखाली चिखल आणि हातात वार्याने वाकडीतिकडी होणारी छत्री अश्या परिस्थितीत जितक्या म्हणून जोरात पळणे शक्य आहे तितक्या जोरात आम्ही पळत सुटलो. छत्रीचा काही उपयोग होत नाहीये उलट त्रासच जास्त होतोय असं लवकरच लक्षात आलं आणि शेवटी छत्र्या मिटून ठेवल्या. वारा इतका जोराचा होता की बोलायला तोंड उघडलं तरी तोंडात पाऊस जात होता! शेवटी एकदाचे कसेबसे आम्ही त्या जंगलात पोचलो. पार दमलो होतो. पण तहान मात्र बिलकुल लागली नव्हती. जरा वेळ बसून पुढे निघालो तोच...
... तेच आता अगदी ओळखीचे झालेले बाण! मग आम्ही बाणाच्या वाटेला लागलो. थोड्यावेळाने जंगल जरा कमी झाले आणि बाणांची वाट एका नांगरलेल्या शेतात येऊन थांबली! परत जरा मागे जाऊन बघितलं आणि दुसर्या एका वाटेवरही बाण सापडले. मग आम्ही हा दुसरा रस्ता पकडला. मग पुढे काही अडचण आली नाही. आता परत आम्ही घनदाट जंगलातून चाललो होतो. अजूनही पावसाचा आवाज जंगलातल्या पानापानावर दुमदुमत होता. पण आता आम्हाला पावसाचा काही त्रास नव्हता. आम्ही नेमके कोणत्या दिशेने जातोय याचा आम्हाला काही पत्ता नव्हता. पण बाण आम्हाला बरोबर नेत होते. पुढे पुढे ती वाट कधी जंगलातून तर कधी माळरानावरून तर कधी शेतांच्या कडेकडेने जात होती. आता पावसाचा जोर कमी झाला होता. धुक्याचं राज्य सुरू झालं होतं. थोड्या वेळाने वाट वर वर चढू लागली. मग खात्री पटली की आता खिंड जवळ आलीय.
...’बापरे! अरे ते बघ!’. भूषण तर अक्षरशः घाबरला. धुकं बरंच कमी झालं होतं आणि समोर आम्हाला एक प्रचंड भिंतच्या भिंत दिसत होती. काळाकुळीत पाशाण. एक झाडसुद्धा त्या कड्यावर दिसत नव्हतं. मान अगदी मोडेपर्यंत मागे करूनही आम्हाला त्या कड्याचा माथा दिसत नव्हता. त्या कड्याचा वरचा भाग धुक्यात लुप्त झाला होता. खूप उंचावर धुक्यात कुठेतरी किंचित उजळ आकाश दिसत होतं. लहान-मोठे शेकडो धबधबे त्या कड्यावरून खाली कोसळत होते. त्या भिंतीची उंची दोन-तिनशे मिटर तरी नक्कीच असेल. प्रत्यक्ष वांदरे खिंडीत पोचेपर्यंत सहा वाजले. वांदरे खिंड पार केल्यावर पलीकडे लगेच वांदरे गाव आहे हे आम्हाला नकाश्यावरून माहितच होते. त्यामुळे एकदम हुरूप आला. आम्ही भराभर खिंड चढून वर आलो. खिंडीतून जरा पलीकडे गेल्यावर लगेचच शेतं दिसू लागली. म्हणजे आलंच की गाव जवळ! आमचा उत्साह वाढला. ‘बरं झालं! उगाच सावले गावात वेळ नाही वाया घालवला ते!’ –भूषण. प्रत्यक्ष वांदरे गावाआधी एक छोटी वाडी होती. पण गावात गेलेलंच बरं असं ठरवून आम्ही गावाकडे निघालो. साडेसहा वाजले होते. अंधार पडायला लागला होता. पण आता दूरवर आम्हाला वांदरे गावातले लुकलुणारे दिवे दिसत होते त्यामुळे हरवण्याचा प्रश्न नव्हता.
वाटेत एक लहानशी नदी लागली. आत्ताच तुफान पाऊस पडून गेल्याने पाण्याला जरा जोर होता. गढूळलेल्या तांबड्या पाण्याची ती नदी रोरावत वाहत होती. पाणी किती खोल आहे त्याचा काही अंदाज येईना. पिशवीतून दोरी बाहेर काढली. एकाने ह्याच तीरावर थांबून दोरीचं एक टोक धरायचं आणि दुसर्याने हळूहळू पाण्यात शिरायचं असं ठरलं. भूषण चांगला सहाफूटी उंच म्हणून तोच आधी गेला. मी ह्या तिरावर दोरी धरून बसलो होतो. दोरीचं दुसरं टोक कमरेला गुंडाळून तो आत शिरला. नदीच्या मध्यावर आल्यावर पाणी त्याच्या कंबरेच्या वर पर्यंत आलं होतं. पाठीवरची पिशवी आता त्याने डोक्यावर घेतली. पाण्याच्या जोरामुळे तो हळूहळू जात होता. तो पलीकडच्या बाजूला गुढघाभर पाण्यात असताना लक्षात आलं की आता दोरी पुरणार नाहीये. म्हणून मग मीही दोरी कंबरेला बांधून पाण्यात शिरलो. पिशवी आधीच डोक्यावर घेतली. नदीच्या मध्यावर पाणी माझ्या छातीपर्यंत आलं होतं. मी डुगडुगत होतो. पण भूषणनी दोरीने जवळजवळ खेचूनच मला बाहेर काढलं. हुश्श!
पुढे एक गोठा लागला. तिथल्या माणसाने थेट गावातल्या मंदिरापर्यंत पोचवलं. साडेसात वाजले होते. मंदिर प्रशस्त, दगडी आणि बंदोबस्तातलं होतं. तिथे एक बाबा राहत होता. तो जरा फटकळ होता. पण त्याने आम्हाला मंदिरात राहायची परवानगी दिली. शिवाय धुनी म्हणून पेटवलेला विस्तव चूल म्हणून वापरायलाही दिला. चला चुलीचा प्रश्न तर सुटला! इतक्या पावसापाण्यात सुद्धा आमच्याकडचे खिचडीचे सामान व्यवस्थित बांधून आणल्यामुळे कोरडे रोहिले होते. खिचडी आणि कांदा-बटाटा रस्सा असा जेवणाचा बेत केला. त्या बाबालाही आमच्या जेवणात सामील करून घेतलं. साडेआठ-नऊ पर्यंत जेवणं उरकली. काल रात्रीसारखी उद्या काय होणार अशी चिंता नव्हती. जरा वेळ पत्ते खेळलो आणि मग इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. गेल्या काही महिन्यापासून भूषण अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत होता त्यात यश मिळालं आहे असं त्याने सांगितलं. काही दिवसातच तो अमेरिकेला प्रयाण करणार होता. त्यामुळे परत अशी गिरिभ्रमंती करायचा योग केंव्हा येईल ते अनिश्चित होतं. पण पुढच्या उन्हाळाच्या सुट्टीत तो परत येईल तेंव्हा परत असंच कुठेतरी जायचं असं आम्ही ठरवलं. गप्पा मारता मारता साडेदहा-अकराच्या सुमारास झोपी गेलो.
वांदरे गाव मोठे होते. साधारण तीस-पस्तीस मोठी घरं गावात होती. घरा-घरांत ‘टिव्ही’ होते. गावात पुण्याहून एस्टी गाड्या येत. साधारणपणे लहान गावातून गाईच जास्त दिसतात. पण ह्या गावात बरेच म्हशींचे गोठे होते. दररोज सकाळी दूध गोळा करणार्या गाड्या गावात येत. ‘झेप’चे लोक ह्याच गावात दहा-पंधरा दिवस मुक्कामाला होते असे त्या बाबाने सांगितले. त्यामुळे या गावातल्या लोकांना बाणांची माहिती होती.
१९ जून ला सकाळी लवकर उठून तडक निघालो. बाण शोधत-शोधत मार्गक्रमणा सुरू केली. मध्ये वाटेत एक ओढा लागला. तिथे जरा थांबून बिस्किटे वगैरे चिल्लर पदार्थांवरच न्याहरी उरकली. आणि परत मार्गक्रमणेस सुरुवात केली. तोपर्यंत बाण शोधत शोधत जात असल्याने आमचा वेग मर्यादित होता. तेवढ्यात आम्हाला चार गावकरी भेटले. त्यातला एक शहराळलेला होता. त्याने सांगितले, ‘अजून दोन अडीच तासात लागतील’. हे लोकसुद्धा भिमाशंकरलाच चालले होते. मग बाणांचा शोध सोडून आम्हीही त्यांचीच चाल पकडली. साडेनऊच्या सुमारास कमळादेवीच्या मंदिरापर्यंत पोचलो. पूर्णपणे उजाड डोंगरमाथ्यावर हे मंदिर उभं आहे. वांदरे गावापासून भिमाशंकरकडे जाणारी ही वाट केवळ आमच्यासारखे हौशी गिर्यारोहकच नाही तर आजूबाजूचे गावकरीही वापरतात. त्यामुळे जिथे ही वाट उजाड माळावरून जाते तिथे वाटेला दोन्ही बाजूला छोटे दगड लावले होते. त्यामुळे माळावर हरवण्याचा प्रश्नच नव्हता.
मंदिरानंतरचा रस्ता वरखाली जात जात एका घनदाट जंगलात शिरला. तिथल्या आंब्याच्या झाडांची खोडं खूप मोठी होती. झाडं खूप उंच आणि दाट होती. एकदम घनदाट जंगल आणि जिकडेतिकडे किड्यांची कीरकीर आणि पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. आज सकाळपासून अजिबात पाऊस पडला नव्हता. पण झाडांवरून पाणी ठिबकतच होतं. आमची वाट भिमा नदीला समांतर जात होती. बहुतेक चाल सपाटीवरची होती. कुठे कुठे हलकासा चढ लागत होता. भिमाशंकर जवळ आल्यावर आम्ही दोन वेळा भिमा नदी पार केली. इथे ती अगदी लहानश्या ओहोळासारखी वाटत होती. जसजसे भिमाशंकर जवळ येत गेले तसतशी वाट सोपी होत गेली. पुढे तर घडवलेल्या पायर्याच लागल्या.
साडेदहाला भिमाशंकरला पोचलो. अकरा वाजेपर्यंत अंघोळी आटपल्या. सव्वाअकरापर्यंत देवाचं दर्शन घेऊन आलो. आता करण्यासारखे काहीच नव्हते. दोघांनी घरी रविवार संध्याकाळपर्यंत परत येऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे मग वेळ न घालवता जेवण करून लगेच परतीची वाट धरू असं ठरवलं. तिथल्याच एका भोजनालयात जेवायला गेलो. आज दोन दिवसांनी तयार गरमागरम जेवण मिळत होतं. मस्त जेवण झाल्यावर जरा इकडे तिकडे करून एकच्या सुमारास परतीची वाट धरली. भिमाशंकरहून खांडसला जायला दोन वाटा आहेत. एक सोपी पण लांबची. बरेचसे यात्रेकरू याच वाटेने येतात. दुसरी वाट शिडीची. ही जरा कठीण आहे पण लवकर पोचवते. आम्ही शिडीच्या वाटेने जायचे ठरवले. ही वाट खूपच उतरणीची आहे. गेले दोन दिवस पावसात सतत दहा-बारा तास चालणे झाले होते. त्या कष्टांनी उतरताना आता सांधे दुखायला लागले. उतरताना त्रास होत होता. आज सकाळपासून अजिबात पाऊस लागला नव्हता. चक्क प्रखर ऊन पडलं होतं. आम्हाला घामाच्या धारा लागल्या. काही ठिकाणी शिडीची वाट जरा अवघड आहे. आम्ही सावकाश उतरत होतो. थोड्याच वेळात ती शिडी आली. शिडी डुगडुगत होती. पाठीवरची पिशवी काढून भूषण आधी खाली उतरला. मग मी दोरी बांधून आमच्या पिशव्या खाली सोडल्या. नंतर मी सावकाश उतरलो. पुढची वाट बरीच सोपी होती. आम्ही भराभर जवळजवळ धावतच उतरत होतो.
खांडस-नेरळ एस्टी पाचला आहे हे आम्हाला भोजनालयातच कळले होते. मध्येच एक नदी लागते. आमच्याकडे बराच वेळ होता. आता आम्ही साडेचारला खांडसला सहज पोचू अशी खात्री असल्याने आम्ही जरा नदीत डुंबायचे ठरवले. गेले दोन दिवस आम्ही पावसाने तर आज घामाने भिजलो होतो. जरा वेळ नदीत डुंबलो. मग आम्ही चांगले कोरडे कपडे चढवले आणि खांडस एस्टी थांब्यावर पोचलो. फक्त साडेचार वाजले होते. थोड्यावेळाने नेरळला जाणारी बस आली. सव्वापाचला आम्ही नेरळच्या मार्गाला लागलो. मधून मधून डुलक्या लागत होत्या. आज पावसाने एकदम दडीच मारली होती. गाडी भरधाव चालली होती. गचके बसत होते. सव्वासहाला नेरळला पोचलो. थोडी पोटपूजा केली आणि मग सातला व्हिटीला जाणारी लोकल पकडली.
गाडीच्या तालावर माझी तंद्री लागली. नदीत डुंबून मी एकदम ताजातवाना झालो होतो. आता गेल्या दोन दिवसात केलेले कष्टसुद्धा जाणवत नव्हते. पाठ दुखत नव्हती. शिणवटा वाटत नव्हता. हा ‘ट्रेक’तर एकदम मस्तच झाला. दोन दिवस मनसोक्त पावसात भिजता आलं. जंगलातून भटकता आलं. माहित नसलेल्या वाटेने जाणं तसं साहसाचं होतं. त्यात पाऊस आणि धुकं यामुळे भरच पडली होती. एरवी आम्ही पाच सात मित्रांचा कंपू मिळून अश्या गिरीभ्रमणाच्या सहलीला जातो. पण ह्यावेळी दोघंच होतो. दोनच जणांनी जाण्यातले फायदे-तोटे कळले. दोघंच असल्याने कोणताही निर्णय घेणं सोपं असतं उगाच वादावादी होऊन तट पडत नाहीत. दोघेच असल्यामुळे कुठे जायचं झालं की एकेकाला 'निघा, निघा' करत हालवावे लागत नाही. दोघांचा स्वयंपाक करणेही सुटसुटीत. पण रस्ता शोधताना, शिडी उतरताना मात्र मनुष्यबळ कमी पडत असल्याचं जाणवत होतं. ह्या ‘ट्रेक’ची आगाऊ माहिती न काढल्यामुळे आपल्याला नेमकं किती अंतर काटायचं आहे, वाटेत काय लागेल, गावं कुठे आहेत, राहण्याची सोय कुठे होऊ शकते वगैरे माहिती नसल्यामुळे जर कुठे गावात पोचायच्याआत अंधार पडला आणि वाट चुकलो तर काय करायचं? अशी कायम धास्ती होती. पण असे सगळे अडथळे पार करून आमचे गिरिभ्रमण कोणताही गंभीर प्रसंग न ओढवता व्यवस्थित पार पडले. वाटेवर अनेक ठिकाणी निसरडे असूनही एकदाही घसरून पडलो नाही! वा! वा! हे छानच... एकच खंत होती बर्याचदा वाटेत धुकं असल्याने संपूर्ण ट्रेक मध्ये आजूबाजूचे डोंगर-दर्या वगैरे सृष्टीसौंदर्य पाहता आले नव्हते. हे खरं तर सगळं पाहायला हवं... हं म्हणजे त्यासाठी हिवाळ्यात परत एकदा ही सहल करायला हवी! हो आणि त्यावेळी राजमाची-ढाक-कोंडेश्वर-भिमाशंकर असा बेतही करता येईल....
‘अहो महाशय, उठा आता, आली तुमची डोंबिवली’ –भूषण. मी ताडकन उठलो आणि स्टेशनवर उतरलो. भूषणला हात करेपर्यंत गाडी सुटली सुद्धा. आता परत अशी एखादी सहल भूषणबरोबर केंव्हा जमणारे कोण जाणे?